- २० हून अधिक मुलांचा मृत्यू
Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतातील तीन कफ सिरप ब्रँडवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर इशारा जारी केला आहे. या सिरपमुळे ५ वर्षाखालील २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. WHO ने या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ तपासणी व अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
संशयित सिरपची नावे-
या विषारी सिरपमध्ये कोल्ड्रिफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या ब्रँडचा समावेश आहे. ही औषधं अनुक्रमे श्रीसन फार्मास्युटिकल्स (तमिळनाडू), रेडनेक्स फार्मास्युटिकल्स आणि शेप फार्मा या कंपन्यांनी उत्पादित केलेली आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे या सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
डायथिलीन ग्लायकोलचा घातक अंश आढळला!
चाचण्यांमध्ये या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) हे विषारी रसायन ४८% पेक्षा जास्त प्रमाणात आढळले, तर परवानगीयोग्य मर्यादा फक्त ०.१% आहे. हे रसायन शरीरातील अवयव निकामी करून मृत्यू ओढवू शकते, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.
मध्य प्रदेशचे औषध नियंत्रक अधिकारी डी. के. मौर्य यांनी सांगितले की, DEG च्या या धोकादायक प्रमाणामुळे मुलांच्या मृत्यूच्या घटनांशी थेट संबंध असल्याची शक्यता आहे.
कंपनीवर कठोर कारवाई-
या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ पावले उचलली असून तमिळनाडूतील श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे. कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या कंपनीवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत छापे टाकले आहेत.
CDSCO आणि WHO समोर अहवाल-
भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) WHO ला अहवाल देताना सांगितले की, दूषित सिरप भारतातून निर्यात करण्यात आले नाही, तसेच बेकायदेशीर निर्यातीचा पुरावा नाही. मात्र, देशांतर्गत बाजारात ही औषधं उपलब्ध होती आणि त्यांच्यामुळे बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.
WHO ची चेतावणी-
WHO ने नागरिकांना आवाहन केलं आहे की, या तिन्ही सिरपपैकी कोणतंही औषध आढळल्यास त्वरित स्थानिक आरोग्य विभाग किंवा औषध नियंत्रण प्राधिकरणाला कळवावं.