नक्षलमुक्त महाराष्ट्राकडे एक पाऊल; गडचिरोलीत माओवादी नेत्यासह 60 हून अधिक शरण!

    15-Oct-2025
Total Views |
 
Naxal free Maharashtra
 Image Source:(Internet)
गडचिरोली :
महाराष्ट्रातून माओवादाचा (Maoist) नाश करण्याच्या दिशेनं मोठा पाऊल उचललं गेलं आहे. माओवादी नेते मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी 60 हून अधिक सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या आत्मसमर्पणामुळे राज्यातील माओवाद्यांच्या सशस्त्र चळवळीवर मोठा धक्का बसला आहे आणि शांततेची शक्यता दृढ झाली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शरणागत माओवाद्यांनी आपली शस्त्रे पोलिसांना सुपूर्द केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक शरणागताला संविधानाची प्रत सुपूर्द करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले.
 
गडचिरोलीतील माओवादाचा इतिहास-
1980 पासून गडचिरोलीमध्ये सुरू झालेल्या माओवादी सशस्त्र चळवळीमध्ये आतापर्यंत 538 सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. भूपतीने माओवादी चळवळीचा सशस्त्र मार्ग सोडून शांततामय वाटा स्वीकारणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे हाच पर्याय असल्याची भूमिका मांडली होती. आता त्याच्यासह 60 हून अधिक सहकाऱ्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे, ज्यामुळे राज्यातील माओवाद्यांचा उपद्रव कमी होण्याची शक्यता आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी भूपतीच्या अटी मान्य केल्या-
भूपतीने शरणागतीच्या आधी अट ठेवली होती की, तो फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण जाईल. त्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले इतर कार्यक्रम बाजूला ठेवले आणि शरणागत माओवादींचे स्वागत केले.
 
भूपती आणि त्यांच्या टीमने शरणागती पत्करल्यानंतर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. पोलीस प्रशासन आणि मध्यस्थांच्या प्रयत्नांमुळे शरणागत माओवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील सशस्त्र माओवाद लवकरच संपेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.