शरद पवारांचा मोठा निर्णय; नव्या पिढीला राजकारणात संधी!

14 Oct 2025 12:40:23
 
Sharad Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना ५० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.
 
पवार म्हणाले, “आपल्याकडे कार्यकर्त्यांची आणि उत्साही तरुणांची मोठी फळी आहे. त्यामुळे ज्यांचा कोणताही राजकीय वारसा नाही, अशा मुलांना आणि मुलींना आता संधी द्या. स्थानिक पातळीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणं ही काळाची गरज आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की, आगामी आठवड्यात स्थानिक आघाड्यांबाबत निर्णय घेऊन महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याचं काम तातडीने पूर्ण करावं.
 
बैठकीदरम्यान पवारांनी अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली. त्यांनी नाव न घेता काही माजी आमदारांवर टीका करत सांगितलं, “महाराष्ट्राचं राजकारण हे कधीच जाती-धर्मावर आधारित नव्हतं. समाजात तणाव निर्माण करणाऱ्या भाषणांपासून दूर राहा. प्रेम, सौहार्द आणि संयम हीच महाराष्ट्राची ओळख आहे.”
 
यासोबतच त्यांनी सांगितलं की, “लोकप्रियतेपेक्षा धर्मनिरपेक्षतेची भावना अधिक महत्त्वाची आहे. सरकारने लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.”
 
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. “राज्य सरकारकडून दिली जाणारी मदत अपुरी आणि औपचारिक आहे. केंद्राने तत्काळ पथक पाठवून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक उद्या होणार असून, जिल्हानिहाय रणनीती ठरविण्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत. शरद पवारांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरणात नव्या उत्साहासह नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Powered By Sangraha 9.0