राज्यातील फक्त पाच जिल्ह्यांनाच मदतीचा लाभ; उर्वरित २८ जिल्ह्यांचे पंचनामे अद्याप प्रक्रियेत

    14-Oct-2025
Total Views |
 
Panchnamas of five Maha districts
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार ३३ जिल्ह्यांतील तब्बल ६८ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ४८ लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचा पहिला हप्ता दिला जाईल. मात्र प्रत्यक्षात केवळ बुलडाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे राज्य सरकारकडे पोहोचले आहेत. त्यामुळे उर्वरित २८ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची शक्यता नाही.
 
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी आणि मंडलाधिकारी पंचनामे तयार करून तहसीलदारांकडे पाठवत आहेत. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर हे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत पडताळणी आणि दुरुस्तीच्या टप्प्यांवर वेळ लागत असल्याने पंचनाम्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी अधिकारी अपुरे असल्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.
 
सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले की, सोलापूरमधील जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित तालुक्यांचे पंचनामे लवकरच मिळतील. प्रशासनाकडून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मदतीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दिवाळी अगदी दारात येऊन ठेपली असतानाही अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदतीचा एकही रुपया मिळालेला नाही. सरकारच्या आश्वासनानंतरही प्रत्यक्ष मदत न मिळाल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर आणि पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी यंदा आनंदाऐवजी चिंतेतच साजरी होण्याची शक्यता आहे.