Image Source:(Internet)
मुंबई:
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने प्रहार जनशक्ती पक्षाला मंत्रालयाजवळ कार्यालयासाठी दिलेली जागा आता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने हा निर्णय घेतल्याने प्रहार जनशक्तीचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.
शिंदे सरकारच्या काळात जनता दल (सेक्युलर)च्या कार्यालयाची काही जागा कमी करून ती प्रहार जनशक्ती पक्षाला देण्यात आली होती. मात्र, सध्याच्या फडणवीस सरकारने तो निर्णय रद्द करत ती जागा पुन्हा मागे घेतली आहे.
या निर्णयावर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत भाजपवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “भाजप म्हणजे विष आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. कार्यकर्त्यांना सोबत घेण्याऐवजी त्यांना दूर ठेवण्याचं राजकारण भाजप करत आहे. अशा पक्षाला माझी काय गरज?” असं कडू यांनी उद्गार काढले.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भाजप आणि प्रहार जनशक्ती यांच्यातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात बच्चू कडू यांचा प्रभाव आणि त्यांचा सक्रिय कार्यकर्ता वर्ग लक्षात घेता, या निर्णयाचे राजकीय परिणाम आगामी काळात प्रकर्षाने जाणवू शकतात.