Image Source:(Internet)
मुंबई :
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत सहभागी सर्व महिलांसाठी आता E KYC (ई-केवायसी) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया न केल्यास योजनेचा लाभ थांबवला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागातील महिलांसाठी अतिरिक्त मुदत-
ई-केवायसी प्रक्रियेत अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणी येत होत्या. यावर लक्ष देत सरकारकडून सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, पूरग्रस्त भागातील महिलांसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
सरकारने ई-केवायसी प्रक्रियेत गती आणण्यासाठी विशेष सुधारणा केल्या आहेत. दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पार पडत आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, आणखी 2.5 लाख महिलांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
लाभार्थी प्रत्येक वर्षी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया फक्त अधिकृत संकेतस्थळावरून केली जाऊ शकते. सरकारने महिलांसाठी ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तातडीने अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.