अमेरिकेला चीनचा ‘पॉवर शॉक’; ट्रम्प यांच्या धोरणाला प्रत्युत्तर म्हणून बीजिंगचा नवा खेळ

14 Oct 2025 18:11:01
- समुद्रमार्गाने सुरु झाला आर्थिक युद्ध

China power shock to AmericaImage Source:(Internet) 
बीजिंग/वॉशिंग्टन:
अमेरिका (America) आणि चीन यांच्यातील तणाव आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. व्यापार क्षेत्रातील संघर्षानंतर आता हे युद्ध थेट समुद्रमार्गावर उतरले आहे. चीनने अमेरिकेच्या झेंड्याखाली चालणाऱ्या जहाजांवर ‘स्पेशल पोर्ट फी’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकेसाठी अक्षरशः ‘२४० व्होल्टचा झटका’ ठरत असून, जागतिक व्यापारावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
चीनचा प्रतिआक्रमक निर्णय काय आहे?
चीन सरकारने जाहीर केले आहे की आता पुढे अमेरिकेच्या मालकीची, अमेरिकेत नोंदणीकृत किंवा अमेरिकन झेंडा धारण करणारी जहाजं चीनच्या कोणत्याही बंदरात प्रवेश करताना विशेष पोर्ट फी भरावी लागेल. चीनची सरकारी वृत्तसंस्था CCTV च्या माहितीनुसार, ही फी फक्त अमेरिकन जहाजांवरच लागू असेल. चीनमध्ये तयार झालेल्या किंवा स्थानिक कंपन्यांच्या जहाजांना मात्र या शुल्कातून सूट मिळेल. तसेच जहाज दुरुस्ती, आपत्कालीन पुरवठा किंवा काही विशेष श्रेणींसाठीही फी माफ असेल.
 
अमेरिकेने आधी फेकला होता ‘फी बॉम्ब’-
चीनच्या या निर्णयामागे गेल्या आठवड्यात अमेरिकेने घेतलेला एक वादग्रस्त निर्णय कारणीभूत ठरला आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनकडून येणाऱ्या जहाजांवर पोर्ट फी आणि टॅरिफ वाढवले होते. अमेरिकेचा उद्देश होता चीनच्या समुद्री व्यापारातील वर्चस्वाला आवर घालणे. मात्र आता चीननेही त्याच अस्त्राने अमेरिकेवर पलटवार केला आहे. त्यामुळे दोन्ही महासत्तांमधील संबंध आणखी बिघडण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. नवीन नियमावली कशी असेल?
 
नव्या नियमांनुसार, कोणतेही अमेरिकन जहाज चीनच्या बंदरावर येताच त्यावर एकदाच विशेष पोर्ट फी आकारली जाईल. मात्र, तेच जहाज जर एका वर्षात वारंवार चीनमध्ये आले, तर पहिल्या पाच भेटींसाठीच फी भरावी लागेल. त्यानंतर १७ एप्रिलपासून नवीन बिलिंग सायकल सुरू होईल. जर एखाद्या जहाजाने फी भरण्यास नकार दिला, तर त्याला बंदरात प्रवेशच नाकारला जाईल, असा चीनच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
 
पुढचा डाव कोणाचा?
चीनच्या या आर्थिक हल्ल्यानंतर आता अमेरिका काय प्रतिक्रिया देणार, याकडे जगभरातील लक्ष लागले आहे. दोन्ही देशांतील व्यापारयुद्ध आता सामान्य दरांच्या पलीकडे जाऊन समुद्रमार्गातील नियंत्रणावर केंद्रीत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील काही दिवसांत ट्रम्प प्रशासन कशाप्रकारे प्रत्युत्तर देते, यावर जागतिक बाजारपेठेचे समीकरण ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0