Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज अचानक अस्वस्थता जाणवल्याने तातडीने मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी येथे रक्त तपासणी करून घेतली होती, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आज सकाळी संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह काँग्रेसला संवादात सामील करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद सुरळीत चालत असल्याचे दिसत आहे. या प्रक्रियेत संजय राऊतांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच, ठाकरे गटाच्या धोरणात्मक निर्णयांचे प्रभावीपणे सादरीकरण राऊतांकडून होत असल्याचेही दिसून येते.
संजय राऊत हे शिवसेनेतील ज्वलंत वक्ते म्हणून ओळखले जातात. २०१९ पासून महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर ते सातत्याने ठाकरे गटाच्या बाजूने सक्रिय राहिले आहेत. दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ता पक्षांवर टीका करणे हा त्यांचा नियम ठरला आहे.
आज अचानक रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु अस्वस्थता जाणवल्यामुळे तातडीने त्यांना उपचारासाठी घेऊन जातले. डॉक्टरांचे पुढील मार्गदर्शन आणि प्रकृतीबाबतची माहिती येणाऱ्या तासांत समोर येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.