आगामी निवडणुकीतील पराभवाची...; २०० बनावट मतदारांच्या आरोपावर आमदार मेघेंचा विरोधकांवर पलटवार

13 Oct 2025 23:03:16
 
MLA Meghe
 
नागपूर :
वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील मतदार यादीत तब्बल २०० बनावट मतदारांची (Fake voters) नोंद झाल्याचा गंभीर आरोप एनसीपी (शरद पवार गट) तर्फे करण्यात आला आहे. परंतु सत्ताधारी भाजपचे आमदार समीर मेघे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत विरोधकांवर पलटवार केला आहे. मेघेंचे म्हणणे आहे की, “विरोधक आगामी निवडणुकीतील आपल्या पराभवाची चाहूल लागल्याने मुद्दाम अशा प्रकारचे खोटे दावे करत आहेत.”
२०० मतदार एका घरात?
एनसीपी-शरद पवार गटाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी असा दावा केला आहे की, वानाडोंगरीतील राजीवनगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये घर क्रमांक १ या एका पत्त्यावर २०० हून अधिक मतदारांची नावे आहेत. त्यामुळे यादीत बनावट मतदारांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बंग यांनी पुढे सांगितले की, स्थानिक निकाय निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणावर गडबड असून काही झोपडपट्टी भागात सत्ताधारी पक्षाशी संबंधित कुटुंबांच्या २७ सदस्यांची नावे अतिरिक्तरीत्या घातली गेली आहेत.
पराभव झाकण्यासाठी खोटे दावे–
या आरोपांवर प्रत्युत्तर देताना आमदार समीअर मेघे म्हणाले, “एनसीपी नेते आगामी नगरपरिषद निवडणुकीतील संभाव्य पराभव झाकण्यासाठी नागरिकांना दिशाभूल करत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही हेच आरोप झाले होते आणि न्यायालयाने ते फेटाळले.”
मेघेंनी सांगितले की, “ज्यांच्या नावांवर आक्षेप घेतला गेला आहे, त्यात दोन बीएलओ (BLO) आणि एक माजी ग्रामपंचायत सदस्यही आहेत. मग हे फर्जी कसे ठरू शकतात?”
माझं कुटुंब पाकिस्तानहून आलं का?
आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याच्या आरोपावर मेघेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली –
“माझे नातेवाईक गेली २०-२५ वर्षं वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातच राहतात. मग त्यांची नावे मतदार यादीत असणं गुन्हा आहे का? ते पाकिस्तानहून आले नाहीत, ते इथलेच नागरिक आहेत,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे विरोधकांवर पलटवार करत सांगितले की, “बंग आणि घोडमारे कुटुंबातील २० लोकांची नावेही याच यादीत असून ते स्वतः त्या भागात राहत नाहीत. मग त्यांच्याविरुद्धही प्रश्न उपस्थित करायला हवा.”
सध्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे वानाडोंगरी परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी या प्रकरणाने नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे स्पष्ट केली आहेत.
Powered By Sangraha 9.0