Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शिक्षणविकासाच्या दिशेने वेग देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेचा गाडा यंदा थांबलेला दिसतो. प्रशासनाकडून कोणतीही पुढची कार्यवाही न झाल्याने या योजनेभोवती अनिश्चिततेचे सावट आहे.
योजनेचा हेतू आणि अंमलबजावणी-
राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण, स्वच्छ व आकर्षक परिसर, तसेच विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी ही योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाली होती. राज्यभरातील हजारो शाळांनी या स्पर्धात्मक योजनेत सहभाग घेतला होता. विजेत्या शाळांना मोठी पारितोषिके देण्यात आली, त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये या योजनेबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात या उपक्रमाचा पुढचा टप्पा सुरूच झालेला नाही.
‘आनंदाचा शिधा’लाही विराम?
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या ‘आनंदाचा शिधा’ या सामाजिक उपक्रमालाही यंदा निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या प्रकल्पांकडे सरकारकडून दुर्लक्ष होतंय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजकीय कारणांची चर्चा रंगली-
राजकीय विश्लेषकांच्या मते, या योजनांवरील स्थगितीमागे सत्तेतर्गत मतभेद असू शकतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सूक्ष्म संघर्ष याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यातच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ सारख्या नव्या योजनांवर सरकारचं लक्ष केंद्रीत झाल्याने शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
निधी आणि प्राधान्याचा प्रश्न-
मंत्रालयीन सूत्रांनुसार, सध्या निधी नवीन योजनांकडे वळवल्यामुळे शिंदे यांच्या काळातील प्रकल्पांना ‘तात्पुरता ब्रेक’ देण्यात आला आहे. मात्र, हे ब्रेक कायमस्वरूपी ठरणार का, हे आगामी काही महिन्यांत स्पष्ट होईल.