First monkeypox case
धुळे :
जगभरात फैलावलेल्या मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. राज्यातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळल्याने आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. या रुग्णाचे दोनही अहवाल पॉझिटिव्ह आले असून सध्या त्याच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा आजार संसर्गजन्य असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम मनपाच्या आरोग्य पथकाने सुरू केले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयालाही याबाबत तात्काळ कळविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाधित रुग्ण २ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. गेली चार वर्षे तो सौदी अरेबियात कामानिमित्त राहत होता. मुलीच्या लग्नासाठी तो घरी आला असताना त्याला त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ लागल्याने तो ३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाला.
डॉक्टरांनी लक्षणांवरून मंकीपॉक्सची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे त्याचे रक्ताचे नमुने घेऊन पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीत रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. खात्रीसाठी दुसऱ्यांदा घेतलेल्या नमुन्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
पुण्यातील NIV नेही या घटनेची पुष्टी करत सांगितले की, धुळेतील हा महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आहे. सध्या रुग्णाला मधुमेह असल्याने उपचार प्रक्रियेत वेळ लागत आहे. मंकीपॉक्सच्या दोन प्रकारांपैकी ‘क्लेड-1’ हा अधिक संसर्गजन्य असून भारतात आतापर्यंत 35 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना अनावश्यक अफवा पसरवू नये आणि स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात, असे आवाहन केले आहे.