नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारणार; महाराष्ट्र सरकारसोबत 'या' कंपनीने केला करार

11 Oct 2025 21:06:04
 
Convention center
 Image Source:(Internet)
नागपूर :
विदर्भात विकासाचा नवा टप्पा सुरू होत आहे. नागपुरात जागतिक स्तरावरील अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर (Convention center) उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि स्पेनमधील सुप्रसिद्ध कंपनी ‘फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला.
 
मुख्यमंत्र्यांच्या मते, “नागपुरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी सुसंगत अशी रचना असावी. तसेच हे केंद्र सर्व वाहतुकीच्या मार्गांनी सहज उपलब्ध असावे.”
 
या प्रकल्पात नागपुरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाईल, जे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रमुख केंद्र ठरेल.
 
या कार्यक्रमात स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो, ‘फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल’चे सीईओ रिकार्ड झेपाटेरो, तसेच जिल्हाधिकारी विपिन इटनकर उपस्थित होते. स्पेनच्या प्रतिनिधींनी भारतातील तांत्रिक प्रगतीचे कौतुक करत, महाराष्ट्रासोबत काम करण्याचा अभिमान व्यक्त केला.
 
करारामुळे नागपुरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उजळणार असून, व्यापारिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0