Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. सोयाबीन, कापूस, तूरसह अनेक पिकांचा मोठा नाश झाला, घरे वाहून गेली, शेतकऱ्यांचा संसार कोसळला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत हवी असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सातबारा कोरा करणे, कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांचा अनुदान देण्याची मागणी पुन्हा एकदा केली.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितले की, विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. हेच पत्र त्यांनी आज माध्यमांसमोर वाचून दाखवलं आणि सरकारवर स्पष्ट संदेश दिला की, आता आपण मुख्यमंत्री आहोत, मग त्या मागणीची त्वरित अंमलबजावणी का होत नाही? ठाकरेंनी आरोप केला की, राज्यातील परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री जाहिरातींच्या प्रचारात मग्न आहेत, तर उपमुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यस्त आहेत.
“परंतु जनता महापुराच्या आणि पावसाच्या संकटात फसलेली आहे,” अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी कर्ज घेण्यासाठी बैलजोडी विकतात, पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवतात, पण आज पिकांचा आणि संपत्तीचा सर्वस्व नाश झाला आहे. त्यांनी विचारले की, साखर उद्योगातील मोठे उद्योगपती भाजपमध्ये गेले की त्यांचे करोडो रुपयांचे कर्ज सरकार हमी देते, तर सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास वेळ का लागतो? शेतकरी भाजपमध्ये सामील झाल्यावरच कर्जमाफी मिळणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंनी सरकारवर दबाव आणत म्हटले की, आता तरी फडणवीसांनी स्वतःच्या जुन्या पत्राची आठवण करून घेऊन “ओला दुष्काळ” जाहीर करण्याचे धाडस दाखवावे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत आणि कर्जमाफीची मागणी जोरदार पद्धतीने पुन्हा एकदा उपस्थित केली.