पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; कर्ज वसुली थांबवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

01 Oct 2025 12:55:26
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्य सरकार महापुरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी केला आहे. महापुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी व नागरिकांना टंचाई काळातील निकषांनुसार सर्व सुविधा आणि सवलती दिल्या जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
मुख्यमंत्र्यांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याने कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये. याचबरोबर पूरग्रस्त कुटुंबांना धान्य, डाळी व आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
पूरामुळे विहिरी कोसळणे, शेतजमिनी वाहून जाणे यासारख्या नुकसानींचा विचार केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन राज्य सरकार स्वतःच्या पातळीवर करणार आहे. पंचनामे दोन ते तीन दिवसांत पूर्ण करून पुढील आठवड्यात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असं फडणवीसांनी सांगितलं.
 
केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून मदत वाटप सुरू केलं असून नंतर केंद्राकडून ती रक्कम भरपाई स्वरूपात घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना ‘ओला दुष्काळ’ या व्याख्येचा समावेश आपत्ती व्यवस्थापन मॅन्युअलमध्ये नसल्यामुळे करता येत नाही, मात्र टंचाई काळातील सवलती जशा लागू होतात तशाच सुविधा पूरग्रस्तांनाही दिल्या जाणार असल्याची हमी फडणवीसांनी दिली.
 
दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी मदतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाणार असून, दिवाळीपूर्वीच मदतीचा लाभ मिळेल याची खात्री सरकार करणार आहे.
 
महापुरामुळे राज्यातील तब्बल ६० लाख हेक्टर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या नुकसानीची भरपाई म्हणून २,२१५ कोटी रुपयांच्या मदत वितरणाला सुरुवात झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. पुढील आठवड्यात आणखी मदतीची मोठी घोषणा केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, संकटाच्या काळात सरकार त्यांच्या सोबत उभं असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0