भिवंडी महाराष्ट्रात असूनही मराठीला नाकारणारे अबू आझमी होतात कोन? मनसेचा संतप्त सवाल

01 Oct 2025 18:02:57
 
MNS Abu Azmi
 Image Source:(Internet)
भिवंडी :
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलेल्या एका विधानामुळे भिवंडीत पुन्हा मराठी-हिंदी भाषेचा वाद चिघळला आहे. आझमी यांनी भिवंडीमध्ये मराठी भाषेची आवश्यकता नाही, असे वक्तव्य केले आहे. “मी मराठी बोलू शकतो, पण भिवंडीत त्याची गरज नाही. मराठीत बोललो, तर दिल्ली-उत्तर प्रदेशात आपलं म्हणणं कोण समजून घेईल?” असे ते म्हणाले. या विधानानंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
 
या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आझमींवर थेट हल्लाबोल केला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले की, “मराठी बोलायला लाज वाटत असेल, तर मनसे पद्धतीने उत्तर द्यावं लागेल.”
 
मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, अबू आझमी महाराष्ट्रात राजकारण करूनही उत्तर प्रदेशातील मतदारांना जास्त महत्त्व देतात आणि मराठी भाषेला कमी लेखतात. त्यामुळे भिवंडीच्या मराठी जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मनसेने म्हटले आहे.
 
दरम्यान भिवंडी महाराष्ट्रात आहे, इथे मराठीचाच सन्मान व्हायला हवा, अन्यथा मनसे आपली भूमिका स्पष्ट करेल,असा इशारा पक्षाने दिला आहे.
Powered By Sangraha 9.0