राज्यभर एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन!

01 Oct 2025 17:21:48
 
Dhangar community
 Image Source:(Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नानंतर आता धनगर समाजाचं एसटी आरक्षणाचं (ST reservation) आंदोलन तापलं आहे. राज्यभर धनगर समाज रस्त्यावर उतरत निदर्शने करत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे परभणी, जालना, सोलापूर, जळगाव आदी जिल्ह्यांत वाहतूक ठप्प झाली आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे ओंकारेश्वर–बऱ्हाणपूर महामार्ग रोखण्यात आला. मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चक्काजाम केला. या आंदोलनादरम्यान रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानी ढोल वाजवत निवेदन देण्यात आलं.
 
परभणीतही धनगर समाज रस्त्यावर उतरला. परभणी–गंगाखेड रस्ता अडवल्यामुळे अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात विविध भागांत मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.
 
जालना जिल्ह्यातील आकाशवाणी चौकात मानवी साखळी करून मुंबई–नागपूर महामार्ग पाऊण तास ठप्प ठेवण्यात आला. या आंदोलनात महिलांचादेखील सहभाग होता. यावेळी जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे सकल धनगर समाजाने अहिल्यानगर–टेंभुर्णी महामार्गावर रस्ता रोको केला. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “आरक्षण आमच्या हक्काचं” अशी घोषणाबाजी केली.
 
जालना जिल्ह्यातील जामखेड फाट्यावर सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित राहून आरक्षणाची मागणी जोरदारपणे केली. समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0