दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्त्यात 3% वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ!

01 Oct 2025 16:18:00
 
dearness allowance
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली:
सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) आणि महागाई राहत भत्ता (Dearness Relief – DR) 3 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
 
किती वाढ?
सरकारच्या नवीन घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा DA 55% वरून 58% वर पोहोचला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाईल. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे थकित भत्ते कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळतील. परिणामी, दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त रक्कम येणार असून, सणासुदीच्या खरेदीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
 
कोणाला लाभ होणार?
हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेतील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. तसेच निवृत्त कर्मचारी (पेंशनर्स) आणि कुटुंब पेन्शनधारकांनाही थेट फायदा होणार आहे. यामुळे सक्रिय कर्मचारी तसेच पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही आर्थिक दिलासा मिळणार आहे.
 
वर्षातील दुसरी वाढ
सरकार दर वर्षी महागाई भत्त्यात सहा महिन्यांच्या अंतराने बदल करते. यावर्षी यापूर्वी एकदा DA वाढवण्यात आला होता. त्यामुळे 2025 मधील हा दुसरा वाढीचा निर्णय ठरतो. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, खरेदी क्षमता टिकावी आणि सणाच्या काळात बाजारातील हालचालींना चालना मिळावी, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
 
सणासुदीचा फायदा-
वाढलेले वेतन आणि महागाई भत्ता यामुळे दिवाळी-दसऱ्याच्या काळात कुटुंबीयांचा खर्च सुलभ होईल. बाजारात खरेदीची गती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Powered By Sangraha 9.0