Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगसंदर्भात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नव्या नियमानुसार, आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून ई-तिकीट (E ticket) आरक्षणासाठी सुरुवातीच्या पंधरा मिनिटांत आधार प्रमाणीकरण आवश्यक असेल.
तिकीट खुले होताच दलालांकडून सॉफ्टवेअर वापरून मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जात असल्याने सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवा नियम लागू केला आहे.
आता तिकीट खुले झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांत फक्त आधार ओळखपत्राशी जोडलेले वापरकर्तेच आरक्षण करू शकतील. त्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना ई-तिकीट बुकिंगची सुविधा मिळेल. तत्काळ तिकीटांसाठी लागू असलेला आधार नियम पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ई-तिकीटांचा काळाबाजार रोखणे हे मोठे आव्हान बनले होते. याच वर्षी अडीच कोटींहून अधिक संशयास्पद वापरकर्त्यांचे खाते बंद करण्यात आले आहे. प्रवाशांनी तिकीट बुक करताना नव्या नियमांचे पालन करावे, अन्यथा अडचण येऊ शकते, असे IRCTC ने आवाहन केले आहे.