- आ. समीर मेघे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
वाडी:
सोनेगाव ( निपाणी ) ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या श्रमिक नगर येथील कुटूंबाना पट्टेवाटप करा अशा आशयाचे निवेदन आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांच्या नेतृत्वात नागपूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
हिंगणा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील औद्योगीक वसाहत हिंगणा भागात ग्रा.पं. सोनेगाव (निपाणी) स्थित आहे. त्या अंतर्गतच्या सर्व्हे क्र. ४५ / २ या एमआयडीच्या मालकीच्या भूखंडावर सन १९८० च्या पूर्वीपासुन म्हणजे सुमारे ४३ वर्षापासुन ४०० गरजु कुटुंबियांनी अतिक्रमणे करुन पक्की घरे बांधली आहेत व त्याठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे. वसाहतीस श्रमीक नगर नाव आहे व त्यांमध्ये विज व पाणी पुरवठा, रस्ते, नाल्यांची बांधकामे, शिक्षण आणि स्वच्छता अभियानांतर्गत स्वतंत्र शौचालयांचा लाभ सुध्दा देण्यात आलेला आहे.
तथापी सदरची अतिक्रमणे नियमानुकुल करुन भूखंडधारकांना पट्टे वाटप करण्याची बाब सन २०१५ ते २०१९ दरम्यान शासनाकडे निवेदनान्वये अनेकदा सादर करण्यात आलेली होती. परंतु अद्यापी त्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही प्रलंबीत राहीलेली आहे. त्याठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांना अतिक्रमीत भूखंडांचे वाटप करण्यास शासन मान्यता झाली नसल्याने घरांची दुरुस्ती, बँकलोन, विस्तारीत बांधकामे गरजेनुसार खरेदी- विक्री यासारख्या वैयक्तीक महत्वाच्या बाबी धारकांना करता येत आहे. त्याचप्रमाणे ४३ वर्षापूर्वी अतिक्रमण करणाऱ्या कुटुंब प्रमुखाचे आजचे वय लक्षात घेता त्यांचे भूखंडाचे पट्टे वाटप आताचे वेळी तरी होण्याचे प्रतिक्षेत ते असल्याची बाब आहे.
(सोनेगाव (निपाणी) श्रमीक नगर येथील अतिक्रमीत भूखंड नियमानुकुल करुन अतिक्रमीतांना निवासी पट्टे वाटपाबाबतची कार्यवाही करण्याबाबत आपले स्तरावरून संबधीतांना निर्देश देण्यात यावे, अशी विनंती निवेदनातुन स्पष्ट केले.यावेळी आमदार समीर मेघे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री कमलाकर इंगळे ,सोनेगाव (निपाणी ) चे भाजपा शक्ती केंद्रप्रमुख विनय कांबळे, श्रमिक नगरचे भाजपा बुथ प्रमुख रामुजी भेंडकर, राहुल फुलेकर उपस्थित होते.