(Image Source : Internet)
नागपूर:
नुकतेच गृहमंत्रालयाकडून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. यामध्ये शहराच्या सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे (Aswati Dorje) यांना महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र येथे विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या जागेवर निसार तांबोळी यांना नागपुरात पाठविण्यात आले. गेल्या आठवड्यातच तांबोळी नागपुरात पोहोचण्याचा अंदाज होता, मात्र त्यांनी आतापर्यंत पदभार सांभाळलेला नाही. दरम्यान सोमवारी पोलिस आयुक्तालयाकडून दोरजे यांना औपचारिकरित्या निरोप देण्यात आला. पोलिस भवनच्या सभागृहात सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी रोपटे देऊन त्यांचे आभार मानले.
ऑगस्ट 2021 मध्ये दोरजे यांनी शहरात नियुक्ती झाली होती. त्यांनी येथे 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पोलिस दीदी आणि पोलिस काका सारखे उपक्रम राबवून महिला, तरुणी आणि मुलांना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे काम त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान डीआयजी प्रमोद शेवाळे, डीसीपी अर्चित चांडक आणि शशिकांत सातव यांनी दोरजे यांच्यासोबत करताना आलेले अनुभव सांगितले. दोरजे यांनीही नागपुरात केलेल्या कामांवर संतोष व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन एसीपी नरेंद्र हिवरे आणि आभार डीआयजी संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला डीसीपी निमित गोयल, राहुल मदने, राहुल माकणीकर, अश्विनी पाटील, श्वेता खेडकरसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.