- RTMNU शताब्दी महोत्सव समापन समारोह निमित्त आयोजन
एबी न्यूज नेटवर्क :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र जीवनावर आधारित 'क्रांतिनायक' या महानाट्याचा ५३ वा प्रयोग डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. या प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समापन समारोह निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनद्वारा आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्याची निर्मिती रंगभूमी, नागपूर द्वारे करण्यात आली होती.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, प्रमोद तिजारे, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
'क्रांतीनायक' या महानाट्यतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे दर्शन प्रेक्षकांना घडले. महाराजांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद, कर्मभूमी चिमूर येथील विविध घटना महानाट्याद्वारे दर्शविण्यात आल्या.
माणिक उर्फ तुकडोजी ते देवबाबा आणि त्यानंतर तुकडोजी महाराज ते राष्ट्रसंत या उपाधी पर्यंत संपूर्ण जीवनचरित्र महानाटकातून दर्शविण्यात आले. महाराजांना अपेक्षित असलेली आदर्श गावावरून आदर्श देशाची संकल्पना महानाट्यातून साकारण्यात आली.