दारूड्या बसचालकाची ऑटोला धडक

31 Aug 2024 23:00:34
- लाडक्या बहिणींना घेऊन जाताना घडली घटना, एक जखमी

Accident news(Image Source : Internet) 
नागपूर:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना घेऊन जात असलेल्या बसच्या चालकाने दारूच्या नशेत निष्काळजीपणे वाहन चालवून ऑटोला जबर धडक दिली. यात ऑटोचा पूर्णत: चुराडा होऊन एक व्यक्ती गंभीर जखमी झाला, तर चालक थोडक्यात बचावला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत मानेवाडा रोडवर घडली. पोलिसांनी ऑटो चालक करीम शाह (26) च्या तक्रारीवरून आरोपी बस चालक संदीप डोंगरे (40) रा. रुई पांजरी विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. जखमी मजहर शाह हुसेन शाह (29) रा. भालदारपुरा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात त्याचे दोन्ही पाय गेल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शनिवारी रेशीमबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये बहिणींना घेऊन जाण्यासाठी आणि परत नेऊन सोडण्यासाठी प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी 4.15 वाजताच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर बस क्र. एमएच-31/डीएस-1538 चा चालक संदीप हा जयताळा परिसरात राहणाऱ्या महिलांना सोडण्यासाठी निघाला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. मानेवाडा रोडवर खानखोजेनगर वळणावर त्याने करीमच्या ऑटो क्र. एमएच-49/सीएफ-2481 ला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, चालक करीम बाहेर फेकल्या गेला. तर ऑटोचा चुराडा होऊन मागच्या सीटरवर बसलेला त्याचा भाऊ मजहर गंभीर जखमी झाला.
 
अपघातानंतर बस चालक संदीपने घटनास्थळाहून पळ काढला. त्याच दरम्यान हुडकेश्वर ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यांनी बसचा पाठलाग केला. ओव्हरटेक करून बस थांबवली. सुदैवाने या अपघातात बसमधील महिलांना कोणतीही दुखापत झाली नव्हती, मात्र सर्व घाबरलेल्या होत्या. संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर दुसऱ्या बसची व्यवस्था करून सर्व महिलांना रवाना करण्यात आले. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून संदीपला अटक केली.
Powered By Sangraha 9.0