लिव्ह इन रिलेशनशिप विवाह संस्थेला पर्याय ठरू शकत नाही!

    30-Aug-2024
Total Views |

live in relationship vs marriage(Image Source : Internet/ Representative) 
 
लग्न न करता पती पत्नी प्रमाणे एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात राहणारे उच्चशिक्षित तरुण तरुणींमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण अधिक आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही महिने राहून पहायचे जर एकमेकांचा स्वभाव पटला तर ठीक, नाही तर ब्रेकअप करून पुन्हा नवीन जोडीदार शोधून त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, असा हा प्रकार आहे. ज्यांना विवाह संस्था मान्य नाही किंवा विवाह करायचा नाही, असे तरुण तरुणी लिव्ह इनला पसंती देत आहे.
 
केवळ अविवाहित तरुणच नव्हे तर घटस्फोट झालेल्या व्यक्तीही लिव्ह इनमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपकडे विवाहाला पर्याय म्हणून पाहणारा एक मोठा वर्ग निर्माण होत आहे. लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्यानेही मान्यता मिळाली आहे. २०१० साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयात लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली आहे. पण ही मान्यता देताना सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही मार्गदर्शक तत्वे पाळणे बंधनकारक आहे. असे असले तरी या मार्गदर्शक तत्वांचे संबंधितांकडून पालन होते का? हा संशोधनाचा विषय आहे.
 
मुळात लिव्ह इन रिलेशनशिप या विषयाची व्याप्तीच इतकी अस्पष्ट आहे की आपल्या अधिकाराची आणि कर्तव्याची लक्ष्मणरेखाच उभयतांना समजत नाही. त्यामुळे अशा संबंधांत कालांतराने कटुता निर्माण होते. दोघांचे पटेनासे होते. विवाह संबंधांमध्ये एकमेकांविषयी जो आदर असतो, तो लिव्ह इनमध्ये नसतो. दोघेही एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाद वाढत जातात. त्यांच्यात मध्यस्थी करणाराही कोणी नसतो. त्यामुळे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचा वाद न्यायालयात पोहोचण्याचा प्रकार अलीकडे खूप वाढला आहे. एकदा वाद न्यायालयात पोहोचला की न्यायालयात हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे संबंधितांचे जीवनही उध्वस्त होते. नातेवाईक, समाजात अवहेलना होते. लिव्ह इनला अटी आणि शर्थीवर कायद्याने मान्यता दिली असली तरी समाजाने ते अजूनही स्वीकारलेले नाही. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडे समाज कुत्सित नजरेनेच पाहतो. म्हणजे ज्या सुखासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग स्वीकारला ते सुख तर वाट्याला येतच नाही, उलट दुःखच वाट्याला येते.
 
खरंतर लिव्ह इन रिलेशनशिपकडे केवळ कायदेशीर दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून पाहिले तर कोणीही लिव्ह इनचे समर्थन करणार नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असतात आणि या पुरकतेला बळ देण्यासाठीच अनादी काळापासून विवाह संस्था अस्तित्वात आली आहे. विवाह हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. विवाह संस्कृतीत काही त्रुटी असतीलही, विवाह झालेल्या जोडप्यांमध्येही पटत नाही. वाद विवाद होतात. काहींचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचतो. घटस्फोटही होतो म्हणून विवाहच नको, लिव्ह इन रिलेशनशिप हा विवाह संस्थेला पर्याय आहे, असे जर कोणी समजत असेल तर ते चुकीचे आहे.
 
janmashtami photo contest 
 
 
लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र राहतात. पण त्यांची एकमेकांप्रति कोणतीही जबाबदारी नसते. या उलट विवाह झालेल्या व्यक्तींना एकमेकांप्रति जबाबदारीचे भान असते. केवळ जबाबदारीच नाही तर प्रेम, त्याग आणि तडजोडी बरोबरच विवाहात समर्पण भावनाही असते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, भौतिकवादी दृष्टिकोन, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची प्रवृत्ती यामुळे शहरात विशेषतः मेट्रो शहरात विवाह संस्थेवरच प्रहार केला जात आहे. आजची उच्च शिक्षित तरुण पिढी कोणत्याही जबाबदारी शिवाय बांधनमुक्त जीवन जगण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ते लिव्ह इनकडे वळत आहेत. पण तेही अटी आणि शर्थीवर बेतलेले असल्याने ते संबंधही ही फार काळ टिकत नाही. त्यापेक्षा समानता, प्रेम आणि जबाबदारीवर टिकून असलेला विवाह लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा हजारो पटीने चांगला आहे, हे लिव्ह इनकडे वळणाऱ्या तरुणांनी समजून घ्यावे.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.