(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क/अमृतसर:
५ कोटींहून अधिक लोकांची फसवणूक करून कोट्यवधींचे साम्राज्य उभारणाऱ्या पर्ल्स ग्रुपचे मालक निर्मिलसिंग भंगू (Nirmal Singh Bhangu) यांचे निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अटक केलेल्या निर्मिलसिंग भंगू हे तिहार तुरुंग बंदी होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. निर्मलसिंह भंगू यांच्यावर PACLम्हणजेच पर्ल्स ग्रुप या चिटफंड कंपनीकडून देशातील 5 कोटींहून अधिक लोकांची 50 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
निर्मलसिंह भंगू हे पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील रहिवासी होते. ते सुरुवातीला दूध विक्रेते म्हणून काम करायचे. नोकरी शोधण्यासाठी ते पंजाबहून कोलकाता येथे गेले. सुरुवातीला त्यांनी चिटफंड कंपनी पीअरलेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी गोल्डन फॉरेस्ट इंडिया लिमिटेडमध्ये काम केले. मात्र, काही वर्षांनंतर ही कंपनी बंद पडल्यामुळे ते बरेच दिवस बेरोजगार होते. मात्र, या दोन्ही कंपनीमध्ये काम केल्याच्या अनुभवावरून त्यांनी लोकांना फसविण्याचे कौशल्य आत्मसात केले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करून लोकांची फसवणूक करणे सुरू केले. पीएसीएल नावाची कंपनी स्थापन करून त्याने लोकांना प्रचंड नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचे साम्राज्य उभारले.
कोट्यवधी रुपयांच्या या चिटफंड घोटाळ्यात अडकलेल्या लोकांचे पैसे परत मिळावेत, यासाठी पंजाब सरकारने मागील वर्षी पर्ल्स ग्रुपची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पर्ल्स ग्रुपच्या मालमत्तेची ओळख पटली असून या मालमत्तांची विक्री करण्याची कायदेशीर प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.