नागपूर :
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी (Dr Abhijeet Chaudhary) यांच्या हस्ते नाल्यावरील सुरक्षा जाळीवर साकारण्यात आलेल्या 'इको ब्रिक्स' कलाकृतीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर @ 2025 चे समन्वयक निमेश सुतारीया प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी कलाकृतीचे कौतुक केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारा नागपूर @ 2025 या संस्थेच्या सहकार्याने आकाशवाणी चौक ते मनपा मुख्यालयाकडे जाणाऱ्या मागार्वरील नाल्याच्या सुरक्षा जाळीवर 'इको ब्रिक्स' च्या सहायाने आकर्षक कलाकृती तयार करण्यात आली आहे. यावर पर्यावरणपूरक असा संदेश लिहिण्यात आला आहे.
मनपा आणि नागपूर @ 2025 च्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत 'इकोब्रिक्स महोत्सव 2024' दरम्यान शहरातील दहाही झोन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून संकलित करण्यात आलेल्या 'इको ब्रिक्स'चा वापर ही आकर्षक कलाकृती साकारण्यासाठी करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध शाळांमध्ये इको ब्रिक्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान शाळांमध्ये तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना इको ब्रिक्स संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी चिमुकल्यांनी धडपड करीत इको ब्रिक्स ची निर्मिती केली.