- स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाचे नागपुरात उद्घाटन
(Image Source : Internet)
नागपूर :
आरोग्य निरीक्षकांची केवळ शहरी वस्त्यांमध्येच वस्त्यांमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गरज आहे. तळागाळात जाऊन जनतेच्या आरोग्याची निगा राखणारे प्रशिक्षित आरोग्य निरीक्षक तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था अनेक वर्षांपासून करीत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालक डॉ कांचन वानेरे यांनी काढले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी यांचे हस्ते झाले.
आयएमए सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. कांचन वानेरे यांच्यासह अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांची मंचावर उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. कांचन वानेरे यांनी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी आरोग्य समन्वयक, आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक म्हणून महाराष्ट्रभर जबाबदाऱ्या मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेसारख्या मान्यताप्राप्त असलेल्या संस्थांमधूनच अभ्यासक्रम करवा असा सल्लाही त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. मंजुषा गिरी यांनी स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमासाठी महिलांचा वाढता टक्का समाधानकारक असल्याचे सांगितले. घरातील स्वच्छतेची व आरोग्याची आपण सर्वच काळजी घेत असतो. पण समाजाचे आरोग्य राखण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकावर असते. पर्यावरण स्वच्छतेसोबतच पूर, महामारीसारख्या नैसर्गिक संकटांना कसे हाताळायचे याचे मार्गदर्शन करणारा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम प्रामाणिकपणे पूर्ण करून समाजाच्या आरोग्याची निरीक्षकाने निगा राखावी, असे त्या म्हणाल्या.
जयंत पाठक यांनी प्रास्ताविकातून स्वच्छ्ता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाची माहिती दिली. तसेच, शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणामात पदभरती सुरू झाल्यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून यावेळी चार बॅचेसमध्ये अभ्यासक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी डॉ. आनंद तट्टे, राहूल गायकवाड, डॉ. रसिकलाल कारिया, हनुमंत बालपांडे, डॉ. हिम्मत मेश्राम, डॉ. मीनाक्षी सिंग डॉ. सुचित्रा पटवर्धन, सुरेखा गायकवाड, रमण शिवणकर, विनय माहूरकर, डॉ. विरेंद्र वानखेडे, दिनकर निंबाळकर, जुई सहस्त्रबुध्दे या अध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राही बापट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निशा व्यवहारे, यशश्री परचुरे यांचे सहकार्य लाभले.