मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ७६ हजार अर्ज जमा

27 Jul 2024 12:13:41
 
Ladki Bahin Yojana
 
नागपूर :
महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपाच्या दहाही झोनमधील प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र आणि आंगणवाडी केंद्रांवर आतापर्यंत ७६०३२ अर्ज जमा झाले आहेत. पात्र महिलांनी विहित मुदतीपूर्वी आपले अर्ज भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
 
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेद्वारे २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये तसेच प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारताना महिलांना कागदपत्रांची योग्य माहिती देणे तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचे देखील काम या केंद्रांवरून केले जाते. मनपाचे झोन कार्यालय तसेच प्रत्येक झोनमधील प्रभागात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. याशिवाय आंगणवाडी केंद्रांमध्ये देखील अर्ज स्वीकारले जात आहेत. या व्यतिरिक्त लाभार्थी महिलांना स्वत: ‘नारी शक्ती दूत’ या मोबाईल ॲप वरूनही अर्ज करता येतो. ॲपमध्ये नाव, पत्ता, यासोबतच इतर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज स्वीकारला जातो, अशी माहिती समाजविकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
 
नागपूर शहरातील प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी झोनचे सहायक आयुक्तांशी बैठक घेतली आहे. याशिवाय त्यांनी स्वत: अर्ज स्वीकृती केंद्रांना भेट देउन प्रक्रियेची पाहणी देखील केली आहे. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या अर्ज स्वीकृती केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
 
मनपाच्या दहाही झोनमध्ये आतापर्यंत एकूण ३३०३७ अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये १३१५४ अर्ज ऑफलाईन तर १९८८३ अर्ज आनलाईन जमा करण्यात आले. तसेच विधानसभा निहाय आंगणवाडी केंद्रांवर अर्ज १२१०२ ऑफलाईन तर ३०८९३ अर्ज ऑनलाईन असे एकूण ४२९९५ अर्ज जमा झाले आहेत. झोनमधील केंद्र आणि आंगणवाडी असे दोन्ही मिळुन ७६०३२ अर्ज जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0