पिकअपच्या धडकेत दोन तरुण ठार

26 Jul 2024 22:10:13
: एका दिवसाच्या फरकाने सापडले दोन्ही मृतदेह

Accident bike(Image Source : Internet/ Representative) 
वरूड:
तिवसाघाट ते वरूड राज्य महामार्गावर सोमवारी दुपारी तीन च्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. यात घटनास्थळावर एकाचा मृतदेह आढळला होता, तर मंगळवारी दुसऱ्याचा मृतदेह सापडला.
 
पोलिस सूत्रांनुसार, प्रमोद कैलास कुसराम (वय २८), लोकेश कमल उड़के (२२, दोन्ही रा. राजुरा नाका, वरूड) अशी मृतांची नावे आहेत. सुरुवातीला प्रमोदचाच मृतदेह दिसल्याने पंचनामा करून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. मात्र, मृतासोबत गेलेला लोकेश घरी परतला नाही म्हणून नातेवाइकांनी मंगळवारी घटनास्थळ गाठले. यावेळी झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. या अपघातात दोघांच्या मृत्यूची नोंद करून शेंदूरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे दोघे एमएच २७ एडी ६०४४ क्रमांकाच्या दुचाकीने तिवसा घाटकडून वरूडकडे येत असताना एमएच २७ एक्स ६०२६ क्रमांकाच्या पिकअपने जोरदार धडक दिली. लोकेश उड़के परतला नसल्याने त्याचे वडील आणि नातेवाइकांनी मंगळवारी सकाळी नऊ वाजता घटनास्थळ गाठून शोध घेतला. त्याचा मृतदेह त्याच दिवशी का दिसू शकला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
चालकाला अटक
अपघातप्रकरणी पिकअपचालक योगेश्वर केशवराव रडके (४०, रा. वरूड) याला शेंदूरजनाघाट पोलिसांनी अटक करून कलम २८१, १२५ (ब), १०६ (१) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनात शेंदूरजनाघाट पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0