एबी न्यूज नेटवर्क :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रोव्हिंसियल लाईफस्टाईल रिटेल सर्विसेस नागपूर या कंपनीच्या वतीने प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. महाराज बाग स्थित विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा प्लेसमेंट ड्राईव्ह शुक्रवार, २६ जुलै २०२४ रोजी पार पडला. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी उपस्थित राहत मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रोव्हिंसिअल लाईफस्टाईल रिटेल सर्विसेस या कंपनीकडून रिटेल सेल्स एक्झिक्यूटिव्ह, कॅशियर जनसंपर्क अधिकारी, ऑपरेशन एक्झिक्युटव्ह (ट्रॅव्हल टुरिझम) या पदांकरिता हा प्लेसमेंट ड्राईव्ह राबविण्यात आला.
प्लेसमेंट ड्राईव्ह करिता एकूण १३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर ६० विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. कंपनीच्या एचआर संजीवनी कटांगडे व वर्षा झा यांच्याकडून मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती. मुलाखतीनंतर रिटेल सेल्स एक्झिक्यूटिव्ह पदाकरिता १०, कॅशियर पदाकरिता ३, जनसंपर्क अधिकारी एक व ऑपरेशन एक्झिक्युटव्ह (ट्रॅव्हल टुरिझम) एक उमेदवाराची निवड केली जाणार आहे.