Blog: निसर्गाची अवकृपा

    26-Jul-2024
Total Views |
The Bounty of Nature
 (Image Source : Internet/ Representative)
 
माणसांप्रमाणे निसर्ग देखील बदलला आहे, असे वाक्य हल्ली सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळते आणि ते खरेही आहे. कारण सध्या निसर्गाच्या लहरीपणा वाढत चालला आहे. निसर्गाचा लहरीपणाचा अभ्यास करणारे हवामान खातेही निसर्गापुढे हतबल ठरत आहे. कारण हवामानासंबंधीचा अंदाज बांधणे त्यांनाही कठीण होत आहे. पूर्वी ज्याप्रमाणे हवामान होते तसे हवामान आता राहिले नाही.
 
सध्या सतत हवामान बदलत असते. निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूत जसे हवामान होते तसे आता राहिले नाही. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे असतात. मात्र गेल्या काही वर्षात आपल्या देशात वर्षभर पाऊस पडतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण वर्षभर कोठेना कोठे अवकाळी पाऊस, गारा तसेच चक्रीवादळे होतच असतात. पावसाळाच नाही तर उन्हाळा आणि हिवाळ्याचीही तीच गत आहे. उन्हाळ्यात तर तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. पूर्वी उन्हाळ्यात सरासरी तापमान ३५ ते ३८ अंशाच्या दरम्यान असायचे, ते आता ४० अंशावर गेले आहेत.
 
अलीकडे ऋतुमान बदलत आहे. कोणत्याच ऋतूची सुरुवात वेळेवर होत नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तिन्ही ऋतू उशिराच सुरू होतात. आता हेच पहा ना जूनमध्ये येणारा पाऊस जुलै संपत आला तरी दडी मारतो आणि आला तर असा येतो की दोन दिवसात दोन दिवसांची सरासरी भरून काढतो. मात्र अशाप्रकारच्या पावसाची आपल्याला गरज नसते. कारण या पावसाने आपले नुकसानच होते. निसर्गाच्या या अवकृपेचे संकट केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगावर आले आहे. अर्थात या बदलत्या हवामानाला आणि निसर्गाच्या लहरीपणास ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार धरले जात आहे.
 
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीवरील तापमानात होणारी वाढ. जेव्हा पृथ्वीवरील सरासरी तापमान वाढते, तेव्हा ग्लोबल वॉर्मिंगची समस्या उदभवते. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दिवसेंदिवस वाढत जाईल, असा इशारा जागतिक हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे यापुढे हवामानात बदल हे होतच राहणार आणि त्यामुळे निसर्गाचा लहिरपणा देखील वाढणार आणि तीच चिंतेची बाब आहे. अर्थात हवामानातील बदल आणि त्यामुळे होणारी निसर्गाची अवकृपा ही केवळ ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे, असे म्हणणे म्हणजे स्वतःच्या चुकीवर पांघरून घालण्यासारखे आहे.
 
निसर्गातील बदलाला जितके ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार आहेत, तितकेच आपण म्हणजे मानव देखील जबाबदार आहोत. मानवाने निसर्गात हस्तक्षेप केला, जंगलतोड करून सिमेंटची जंगले उभारली. बेसुमार वृक्षतोड केली. औद्योगिकरणाच्या नावाखाली कार्बन उत्सर्जन केले. वाहतुकीच्या नावाखाली प्रदूषण वाढवले. निसर्गावर अतिक्रमण करून निसर्गावर अन्याय केला. नदी नाल्यांचा मार्ग बदलला. या सर्व कारणांमुळे पृथ्वीवरील हवामान बदलत आहे. सजीवांना विशेषतः मानवाला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते. मात्र मानवाच्या चुकांमुळे स्वार्थामुळे हवेत घातक रसायनांचे आणि प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सतत होणाऱ्या जंगलतोडीमुळे जंगलाखालील एकूण क्षेत्र २० टक्क्यांपेक्षा खाली आले आहे, त्याचा मोठा परिणाम हवामान बदलावर झाला आहे. हवामान बदलामुळे निसर्गाचा लहरीपणा वाढला आणि निसर्गाने आपल्यावर अवकृपा करण्यास सुरुवात केली.
 
भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील ७० टक्के नागरिक शेती आणि त्याला पूरक असणारे व्यवसाय करतात. निसर्गाच्या लहिरपणाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. बदलत्या हवामानमुळे कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्री वादळे अशा नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे अनेकांनी शेती करणेच बंद केले आहे. तरुण वर्गाने गाव सोडून थेट शहर गाठले आहे. परिणामी गावे ओसाड होत आहे, तर शहरांची लोकसंख्या वाढत आहे.
 
हवामान बदलाचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर देखील होत आहे. हवामान बदलामुळे श्वसनाचे आणि इतरही आजार वाढत आहे. निसर्गाचा लहरीपणाचा परिणाम केवळ मानवावरच नाही तर पशु पक्षी आणि सजीवांवर देखील होत आहे एकूणच निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवरच होत आहे. निसर्गाची जर अशीच अवकृपा राहिली तर त्याचा परिणाम केवळ आपल्यालाच नाही तर येणाऱ्या पिढीला देखील भोगावा लागेल म्हणून या बदलत्या हवामानाची आणि त्यामुळे होणाऱ्या निसर्गाच्या अवकृपेची मानवाने गंभीर दखल घ्यायला हवी. हवामान बदलामुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन मानवाने आतापासूनच सकारात्मक पावले उचलायला हवीत. निसर्गाच्या या अवकृपेच्या संकटाकडे जर मानवाने दुर्लक्ष केले तर भविष्यात त्याची मोठी किंमत केवळ आपल्यालाच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीला चुकवावी लागेल.
 
 
  
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.