नराधमास 3 वर्षाचा सश्रम कारावास

25 Jul 2024 23:35:48
 
POCSO special court
 
नागपूर :
घरून किराणा दुकानात जात असलेल्या 10 वर्षीय मुलीला बहाण्याने निर्जनस्थळी घेऊन जात अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चरणदास कुसन मेश्राम (55) रा. आंबेडकरनगर, कंट्रोल वाडी, असे दोषीचे नाव आहे.
 
वाडी पोलिसांनी 24 डिसेंबर 2022 रोजी चरणदास विरुद्ध गुन्हा नोंदविला होता. घटनेच्या दिवशी परिसरात राहणारी 10 वर्षांची मुलगी शाळेतून घरी परतली.आईकडून पैसे घेतले आणि नुडल्स घेण्यासाठी किराणा दुकानात जात होती. रस्त्यात चरणदासने तिला थांबविले. नुडल्स घेऊन देण्याच्या बहाण्याने उद्यानामागील नाल्याजवळ घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने घरी जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चरणदासला अटक केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शकुंतला गोंबाडे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील आसावरी परसोडकर आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाल्या. न्यायालयाने पोक्सोच्या कलम 8 अन्वये चरणदासला दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोहवा अनिल पोतराजे यांनी अभियोजन पक्षाला सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0