चिखलदरासह अनेक गावे रात्रभर अंधारात?

25 Jul 2024 18:01:39
- वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार
 
electricity
(Image Source : Internet/ Representative) 
 
चुरणी :
पावसामूळे चिखलदऱ्यातील वातावरण आल्हाददायक झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे. मात्र त्यांना येथे विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. मंगळवार 23 जुलै ला चिखलदऱ्यासह आजुबाजूंच्या वीज नसल्याने येथे रात्रभर अंधार होता.
चिखलदरासह आलाडोह, लवादा, शहापूर परिसरात नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी केव्हाही संपर्क केले असता अंजनगाव वरून बंद आहे असे सांगण्यात येते.
 
तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामाकरिता येथे येत असलेल्या नागरिकांना वीजे अभावी काम न होता, आल्या पावली परतावे लागते. वाऱ्यामुळे तारांमध्ये घर्षण होवून वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या निर्माण होत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. दुसरीकडे परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असल्याने वीज गेल्यावर येथे भीतीचे वातावरण असते.
 
चिखलदरा व ग्रामीण परिसरात विजेची मोठी समस्या आहे. या ठिकाणी बर्याचदा वीज बंद राहते. आम्ही शहापूरसाठी नवीन फिडरची मागणी केली आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन शहापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच बाबू हेकडे यांनी केले आहे.
 
तसेच मेळघाटातील चिखलदरा तसेच आसपासचे डोंगरदऱ्यातील सर्व गावांना विद्युतपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्याकरिता महावितरणचे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत. निरंतर पाऊस आणि वाऱ्यामुळे येथे वारंवार वीज पुरवठा खंडीत होते, असे चिखलदरा वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता तृषाल राहाटे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0