औषधाचे दर निर्धारणासंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा एक सूर; बैठकीत म्हणाले...

25 Jul 2024 16:07:45
Rates of medicines
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अशासकीय सदस्य श्यामकांत पात्रीकर, कांचनमाला माकडे, भावना क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, नरेश क्षिरसागर, सौरभ मिश्रा, पूर्व विदर्भ अध्यक्ष लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था प्रदिप शर्मा, सदस्य प्रतिनिधी ज्योती शर्मा, व्यापार उद्योग प्रतिनिधी सदस्य अकिंत बोहाट, वैशाली तळवेकर आदींसह निमंत्रित सर्व विभागाचे प्रतिनिधी तसेच अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
बैठकीत आरोग्य संदर्भातील व औषधांच्या दराबाबत चर्चा करण्यात आली. औषधांचे दर निर्धारण करणे अत्यंत गरजेचे आहे. वर्षातून एकदाच दर निश्चित करावे. त्याचबरोबर वस्तुचे उत्पादन शुल्क निश्चित करावे. सर्वसामान्य ग्राहकांशी निगडीत प्रश्नांच्या समस्यांची विविध शासकीय आयुधांच्या माध्यमातून उकल होण्याची गरज असल्याचा सूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिसून आला.
 
यावेळी 31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मागील बैठकीतील इतिवृत्ताचे वाचन तसेच मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच मिठाई व खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ, विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था, शिक्षणविभागाद्वारे रस्ता सुरक्षेबाबत शाळांमध्ये जानजागृती, तसेच शहरातील रस्त्यांवरील श्वानांच्या बाबत कारवाई, महानगरातील घनकचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
 
ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य श्यामकांत पात्रीकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी नागपुरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून फूटपाथ मोकळे करावे, पेट्रोल पंपावर पारदर्शकतेसाठी फलक लावावे. ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य कांचनमाला माकडे यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला.
Powered By Sangraha 9.0