Delhi Excise policy CBI case : अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

25 Jul 2024 18:36:25
Arvind Kejriwal
 (Image Source : Internet)
 
नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहे. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी केजरीवाल यांची ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल यांची हजेरी झाली असून सीबीआयने त्यांना तिहार तुरुंगातूनच अटक केली होती.
 
 
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के कविता हेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 31 जुलैपर्यंत आणि के. कविता यांची न्यायालयीन कोठडी 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.
 
केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर ते केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणांमध्ये हजर झाले होते. यापूर्वी १२ जुलै रोजी सीबीआयमार्फत तपास सुरु असलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.
Powered By Sangraha 9.0