मनोज जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

    24-Jul-2024
Total Views |
Pravin Darekar Criticism
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले उपोषण मागे घेतले. ग्रामस्थांच्या आणि मराठा समाज बांधवांच्या आग्रहानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. याचदरम्यान भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावरही शेलक्या व शिवराळ भाषेत जरांगे यांनी टीका केली. जरांगे यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
तुमच्यावरचा मराठा समाजाचा विश्वास गेलेला आहे, मराठा आरक्षणासाठी जे जे करण्यासारखे आहे ते सरकार करत आहे. विधानसभेत महाविकास आघाडीला कशी मदत होईल, हाच त्यांचा हेतू आहे, हे राज्यातील जनतेला समजून आले आहे. त्यामुळे, जरांगे यांच्या नौटकीला मराठा समाज भुलणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आरक्षणाबाबत तुम्ही का विचारत नाहीत, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर पलटवार केला आहे. आता तुमचा हेतू लक्षात आलेला आहे, त्यांच्या मनात पोटात जे होते ते आज बाहेर आलेले आहे. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे, कुणाला निवडून आणणार, कुणाला पाडणार यातून सर्व दिसून आलं आहे. मला राजकरणात रस नाही असे जरांगे म्हणतात मग राजकीय का बोलतात, असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे.
 
जरांगे यांच्या मागे कोण आहे हे वेगळ सांगायची गरज नाही, जरांगेने मराठ्यांचे प्रश्न सोडले असून आता ते राजकीय ओरिएंटल झाले आहेत, त्यांची अपेक्षा आहे मला आता जेलमध्ये टाकावे, त्यांची प्रसिध्दी कमी झाली म्हणून त्यांचा हा अट्टाहास आहे. जरांगे यांच्या डोक्यात अंहकाराची हवा गेलेली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. ज्यांच्यासाठी राजकीय पोळी भाजत आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही दरेकर म्हणाले.