Kupwara Encounter : कुपवाडा चकमकीत एका दहशतवाद्याचा खातमा; एक जवान शहीद

    24-Jul-2024
Total Views |
One terrorist killed in Kupwara encounter
 (Image Source : Internet)
 
श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लोलाबच्या त्रिमुखा टॉप येथे मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये कॅगकमक सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खातमा केला आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून थोड्या थोड्या वेळाने दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवानही जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या जवानाचा जीव वाचला नसून त्याला वीरमरण आले आहे.
 
 
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने X वर या चकमकीबाबत माहिती शेअर केली आहे. याआधी मंगळवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा या सीमावर्ती जिल्ह्यातील लोलाबमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.
 
 
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले की, कोवुत, कुपवाडा येथे दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी 23 जुलै रोजी संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. 24 जुलै रोजी, सजग सैन्याने संशयास्पद क्रियाकलाप लक्षात घेतला आणि त्यांना आव्हान दिले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात एक दहशतवादी ठार झाला असून एक एनसीओ जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, सुरक्षा दलांना लोलाबच्या त्रिमुखा टॉप भागात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. या आधारे कुपवाडा पोलिसांनी लष्कराच्या 28 आणि 22 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह परिसराला वेढा घातला आणि संयुक्त शोध मोहीम राबवली. घेराव घट्ट होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.