स्वयंरोजगाराकरीता कर्ज योजना; आजच असा करा अर्ज

24 Jul 2024 14:33:27
 
Loan Scheme for Self Employed
 
एबी न्यूज नेटवर्क :
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरीता व पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनी मार्फत वडार व रामोशी समाजातील लोकांकरीता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी सलंग्न व्यवसाय, लघुउद्योग, वाहतुक क्षेत्रातील संबंधीत व्यवसाय, तांत्रीक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त् माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत 50 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे, त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म १२ टक्क्यापर्यंत लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करते.
 
हेही वाचा : Union Budget 2024-25 : अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? पहा संपूर्ण यादी 
 
असा करा अर्ज...
या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या WWW.VJNT.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच बीज भांडवल कर्ज योजने अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत व थेट कर्ज योजने अंतर्गत 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेकरीता महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयात येऊन संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0