दुर्गमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

24 Jul 2024 16:07:59
Disruption of Daily Life in Durg
 (Image Source : Internet/ Representative)
 
दुर्ग :
छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या-नाल्यांना तडाखा बसला असून त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांगोरी गावातील वीटभट्टीवर काम करणारे कामगार आणि त्यांचे कुटुंब पुरात अडकले होते. मात्र, एसडीआरएफच्या पथकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पुरामध्ये अडकलेल्या 12 हून अधिक लोकांचे प्राण SDRF च्या टीमने वाचवले असून त्यांना सुरक्षितस्थळी नेले आहे.
 
राजनांदगाव जिल्ह्यातील मोंग्रा बॅरेजमधून शिवनाथ नदीत नुकतेच ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शिवनाथ नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. शिवनाथ नदीच्या काठावरील पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठी राहत असलेल्या सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ढोला, भोटाली, रुडा, खडा, चांगोरी, ठाणौड, पेसेगाव, महमरा, पुलगाव, कोसमी, मोहलाई, नगपुरा, मालुड, बेलौडी, पिपरचेडी, झेंझरी, हातगाव, गण्यारी, सेहगाव या गावांचा यामध्ये समावेश आहे. पावसामुळे तांदुळा जलाशयात 40 टक्के, खारखरा जलाशयात 43 टक्के, खापरी जलाशयात 42 टक्के आणि गोंदली जलाशयात 22 टक्के पाणीसाठा झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणमध्ये सर्वाधिक 444.5 मिमी तर बोरीमध्ये सर्वात कमी 164.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय दुर्गमध्ये 223.7 मिमी, धम्मधामध्ये 188.2 मिमी, भिलाईमध्ये 220.2 मिमी आणि अहिवरा येथे 282.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Powered By Sangraha 9.0