मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: मनुष्यबळ मागणी नोंदविण्याचे आवाहन

24 Jul 2024 17:54:23
Chief Ministers Youth Work Training Scheme
 (Image Source : Internet)
अकोला :
युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे अनुभव देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय, निमशासकीय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, महाविद्यालये, खाजगी आस्थापना आदींनी मनुष्यबळाची मागणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
 
पात्रताधारक रोजगार इच्छूक उमेदवार व आस्थापनांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची नोंद कौशल्य विकास, रोजगार विभागाच्या https://roigar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन करण्यात येईल.
 
खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवाक्षेत्रासाठी २० टक्के एवढे उमेदवार, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय, आस्थापना, उद्योग, महामंडळ यांच्या मंजूर पदाच्या ५ टक्के एवढे उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
 
उमेदवाराचे कार्य प्रशिक्षण कालावधी हा ६ महिन्याचा राहील. या कालावधीत उमेदवाराला त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार एचएससी (१२ वी) साठी सहा हजार रु., आयटीआय किंवा पदविका यासाठी आठ हजार रु. आणि पदवी, पदव्युतरसाठी दहा हजार रु. प्रतिमाह विद्यावेतन मिळेल. कार्य प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आस्थापनेकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
 
सर्व आस्थापनांनी mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्व आस्थापनांनी त्यांना आवश्यक मनुष्यबळाची मागणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला या पत्त्यावर किंवा कार्यालयाच्या akolarojgar@gmail.com या मेल आयडीवर कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0