लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील माहिती आधार कार्डनुसार भरण्याचे आवाहन

24 Jul 2024 17:24:47
vardha
(Image Source : Internet/ Representative) 
वर्धा :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारी शक्तीदूत’ॲपद्वारे अर्ज भरताना संबंधित महिलेचे नाव, जन्म दिनांक, संपूर्ण पत्ता आदी माहिती आधारकार्ड नुसार भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आता गावपातळीवर ऑनलाईन अर्ज भरण्यास येणाऱ्या समस्या पाहता ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.
 
यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित यंत्रणांना सुचना दिल्या असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात येत आहे. लाभार्थी महिलेला दीड हजार रुपयांची रक्कम थेट डीबीटी व्दारे खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सुचना देण्यात आल्या आहे.
 
नारी शक्तीदूत अपॅमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधारकार्डवर जे नाव लिहिले आहे. तेच नाव अर्जात लिहावे. आधारकार्डवरील जन्म दिनांक ॲपमध्ये नोंदवावा. आधारकार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरुन जन्मदिनांक घेण्यात यावा. आधारकार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतंत भरावी. अशा सुचना करण्यात आल्या आहे. आधारकार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरील तेच नाव असल्याची खातरजमा करावी. आधारक्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करुन तशी माहिती ॲपमध्ये भरावी अशाही सुचना करण्यात आल्या आहे.
 
गावपातळीवर ऑफलाईन अर्ज
नारी शक्तीदूत ॲपव्दारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र गावपातळीवर अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत. दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी गर्दी वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर ऑफलाईन पध्दतीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायतींमध्ये वार्डनिहाय शिबिराचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
 
अर्ज भरण्यासाठी मिळणार प्रोत्साहन भत्ता
गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी समुदाय संसाधन व्यक्ती यांची समिती स्थापन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज पुर्ण भरण्यासठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, नागरी सेतु केंद्रातील प्रतिनिधी समुदाय संसाधन व्यक्तींना प्रतिअर्ज 50 रुपयांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता शासनातर्फे देण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0