व्यवसायाच्या नावावर 37.50 लाखांचा गंडा

24 Jul 2024 23:18:30
 
Fraud case
(Image Source : Internet/ Representative) 
नागपूर :
सोबत मिळून व्यवसाय करण्याच्या बहाण्याने अमरावतीच्या एका ऑटोडीलरने शहरातील व्यावसायिकाची 37.50 लाख रुपयांनी फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी मोहम्मद शाहिद असरार अहमद (40) रा. मोमिनपुराच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. सय्यद इमरान बकार अली हुसेन (33) रा. वळगाव रोड, अमरावती, असे आरोपीचे नाव आहे.
 
शाहिदचा एक मित्र ऑटोडीलिंगचा व्यवसाय करतो. 2022 मध्ये त्याने शाहिदला व्यवसायात पैसे गुंतविल्यास भरघोस नफा मिळण्याची माहिती दिली आणि मोमिनपुरा परिसरातच इमरानशी भेट घालून दिली. लिलावात वाहने खरेदी करून बाजारात विकल्यास चांगला नफा मिळत असल्याचे इमरानने त्याला सांगितले. सुरुवातीला शाहिदने त्याला 3 लाख रुपये दिले. 15 दिवसातच इमरानने 3.80 लाख रुपये परत केले. त्यामुळे शाहिदचा इमरानवरील विश्वास वाढला. त्यानंतर इमरानने कारचा लॉट आला असल्याची माहिती दिली. तसेच कार खरेदी करण्यासोबतच कार्यालय आणि पार्किंगसाठी मोठी जागा घ्यावी लागेल. जितकी अधिक गुंतवणूक तितका अधिक नफा मिळेल, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शाहिदने 28 जानेवारी 2022 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान स्वत:च्या व नातेवाईकांच्या खात्यातून इमरानच्या खात्यांत 37.50 लाख रुपये जमा केले. मात्र नफा तर सोडा मुळ रक्कमही परत मिळाली नाही. शाहिदने पैसे परत मागितले असता इमरानने जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर त्रस्त होऊन शाहिदने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0