अमेरिकेत कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प

    23-Jul-2024
Total Views |

Donald Trump vs Kamala Harris in America
(Image Source : Internet)
 
Donald Trump vs Kamala Harris in America | अमेरिकेत दर चार वर्षांनी अध्यक्षीय निवडणूक होते. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार असून या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही असल्याने अध्यक्षपदासाठी दोन प्रमुख पक्षाचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात.
 
रिपब्लिकन आणि डेमॉक्रटिक असे दोन मुख्य पक्ष अमेरिकेत आहेत. रिपब्लिकन पक्ष हा पारंपरिक विचार सरणीचा म्हणजे उजव्या विचारांचा आहे, तर डेमॉक्रटिक पक्ष हा पुरोगामी विचारांचा आहे. सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे याच डेमॉक्रटिक पक्षाचे आहेत, त्यांनी मागील निवडणुकीत म्हणजे २०२० साली झालेल्या निवडणुकीत तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते, त्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या कामगिरीवर अनेकजण नाराज होते. त्यांची चार वर्षाची कामगिरी निराशाजनकच होती. जागतिक राजकारणात त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. विशेषतः रशिया युक्रेन युद्धात त्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका अनेकांना आवडली नाही.
 
जागतिक महासत्ता असलेल्या राष्ट्राच्या प्रमुखाकडून अशी बोटचेपी भूमिका कोणालाही पटली नाही. शिवाय त्यांच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत अमेरिकेत नाव घ्यावे, असे कोणतेही मोठे कार्य घडले नाही. त्यामुळे जनतेत त्यांच्या विषयी नाराजी होती. केवळ जनतेतच नाही तर त्यांच्या पक्षातच त्यांना विरोध होता. शिवाय त्यांचे वय आणि शारीरिक क्षमता यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचे वय ८४ आहे. या वयात ते देशाचे नेतृत्व सक्षमपणे करू शकत नाही. वाढत्या वयामुळे ते सतत आजारी असतात. त्यांना विस्मरणाचा देखील आजार आहे. त्यामुळे त्यांनी यावेळी निवडणूक लढवू नये असा मतप्रवाह त्यांच्या पक्षात होता.
 
या उलट त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक म्हणून ओळखले जातात. उजव्या विचासरणीचे आणि रशियाला त्यांचा असणारा प्रखर विरोध यामुळे ते बायडन यांना भारी पडतील असा कयास व्यक्त केला जात होता. त्यात निवडणुकीपूर्वी प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये त्यांनी बायडन यांच्यावर मात केली. प्रेसिडेंशिल डिबेटमध्ये बायडन पडले होते. त्यातच ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. या सर्व परिस्थितीत बायडन यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी व उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवारी द्यावी, असा दबाव त्यांच्यावर त्यांच्या पक्षातून टाकला जात होता. अखेर आज त्यांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली आणि कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असतील अशी घोषणा केली. त्यामुळे आता हॅरिस विरुद्ध ट्रम्प असा सामना अमेरिकेत रंगेल.
 
या क्षणी तरी रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत, मात्र निवडणुकीला अजून चार महिने बाकी आहेत. त्यामुळे कोण जिंकेल हे ठामपणे सांगता येणार नाही. त्यात कमला हॅरिस यांना मानणारा मोठा वर्ग अमेरिकेत आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्याने भारतीय तसेच आशियायी मतदार कमला हॅरिस यांना मतदान करतील, असाही कयास आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल यात शंका नाही.
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.