Kargil Vijay Diwas : पंतप्रधान मोदी ३ दिवसीय द्रास दौऱ्यावर जाणार

22 Jul 2024 17:01:03

PM Modi to visit Drass on July 26
(Image Source : Internet)
 
नवी दिल्ली :
कारगिल विजय दिवसाच्या (Kargil Vijay Diwas) 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी लडाखमधील द्रासला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा ३ दिवसांचा हा द्रास दौरा असणार आहे. येथे ते कारगिल विजयाच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. या समारंभात पंतप्रधान मोदी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर बीडी मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.
 
लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बीडी मिश्रा यांनी रविवारी सचिवालयात बैठक घेतली आणि द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला पंतप्रधानांच्या भेटीच्या तयारीचा आढावा घेतला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
 
लेफ्टनंट मिश्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्यास सांगितले. पंतप्रधानांच्या भेटीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी 24 जुलै रोजी ते द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील, असेही त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, कारगिल युद्ध 26 जुलै 1999 रोजी झाले होते. जवळपास तीन महिन्यांच्या युद्धानंतर भारताने कारगिलच्या शिखरावर पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या युद्धात 500 भारतीय जवान शहीद झाले होते.
Powered By Sangraha 9.0