आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुपूजन आवश्यक

    22-Jul-2024
Total Views |
- सद्गुरुदास महाराज यांचे प्रतिपादन
 
- गुरुमंदिर परिवाराचा गुरुपौर्णिमा उत्सव
 
Guru Pujan
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
गुरुभक्ती केल्याशिवाय सुख नाही आणि आत्मज्ञानाशिवाय त्याची प्राप्ती नाही. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुपूजन (Guru Pujan) आवश्यक असल्याचा हितोपदेश धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांनी शिष्यांना दिला.
 
जयप्रकाश नगर येथे श्रीगुरुमंदिर परिवार आणि पत्रभेट समूह यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृहात सद्गुरुदास महाराज यांचा गुरुपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिष्यांशी संवाद साधताना सद्गुरुदास महाराज यांनी, प्रत्येक व्यक्ती आनंद प्राप्तीच्या शोधात असते आणि ते त्याचं ध्येय देखील असलं पाहिजे. या मार्गात मार्गदर्शन म्हणून गुरुभेट झाल्यास साधकाला गुरूसह आनंदप्राप्ती होते. कारण गुरू हे देवांचे दैवत आहे. त्यामुळे गुरू आणि गोविंद समोर उभे ठाकल्यास प्रथम गुरुवंदना करावी. कारण गुरूच साधकाला देवांपर्यंत पोहोचवतात, असा संदेश देखील त्यांनी यावेळी दिला. उपासनेचे महत्त्व पटवून सांगताना त्यांनी, गुरू म्हणजे अथांग प्रेमाचा सागर आहे. साधक आपल्या मार्गात चुकल्यास गुरू त्याला प्रसंगी रागावून योग्य मार्गावर आणतात. त्यांचे रागावणे हे गुरुप्रेम असते आणि त्याला उपासनेच्या माध्यमातून ते सन्मार्ग देखील दाखवितात, असे सांगितले.
 
मुख्य सोहळ्यापूर्वी दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे प्रकाशित श्री गुरुवंदन या पुस्तिकेचे लोकार्पण सद्गुरुदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संपादक संदीप भारंबे, गुरुमंदिर परिवाराचे अजय देशमुख, मोहन बरबडे उपस्थित होते. या पुस्तिकेविषयी बोलताना सद्गुरुदास महाराजांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालत समाजप्रबोधन करण्याचे काम दैनिक सकाळ करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी साकोली तालुक्यातील शेंदूरवाफा येथील श्यामसुंदर चांडक यांनी सद्गुरुदास महाराजांना चांदीच्या पादुका समर्पित केल्या.
 
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरुमंदिरातील मूर्तींना पवमानसुक्ताभिषेक, तर ठेंगडी सभागृहात टेम्बे स्वामी आणि विष्णुदास महाराज यांच्या पाहुकांना रुद्राभिषेक करण्यात आला. उपस्थित साधकांनी नियमित उपासनेसोबत घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण केले. यावेळी सुघोष शंखनाद पथकाच्या सादरीकरणादरम्यान सद्गुरुदास महाराज यांचे पूजन स्थळी आगमन झाले. यानंतर सर्व साधकांतर्फे भंडार्‍याचे शेखर व जयश्री जोगळेकर, तसेच सचिन व पूजा देशपांडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात महाराजांचे पाद्यपूजन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते. महाप्रसादाने द्विदिवसिय सोहळ्याची सांगता झाली.