Guru Purnima : गुरूला साक्षात देव मानणारी आपली संस्कृती

    21-Jul-2024
Total Views |

Guru Purnima
 (Image Source : Internet/ Representative)
 
 
आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा (Guru Purnima) म्हणजे गुरूंच्याप्रति लिन होण्याचा आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आषाढ महिन्यांत गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरुतत्व एक हजार एक पटीने कार्यरत असते त्यासाठी शिष्य यादिवशी अखंड आपल्या गुरुसेवेत मग्न असतो. गुरू शिष्य नाते हे असे एक नाते आहे की ज्याला मर्यादा नाही. अखंड साधनेत कार्यमग्न असणे, गुरूंनी दिलेले नाम घेणे, गुरूंचा महिमा गाणे, प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करता गुरू कार्य करणे, असं अतूट नातं म्हणजे गुरू शिष्याचं नातं. गुरू शिष्य परंपरा हे आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आपल्या देशात तर गुरुचे महत्व खुप आहे. गुरूला (Guru Purnima) साक्षात देव मानणारी आपली संस्कृती आहे. म्हणूनच
 
गुरुर ब्रह्मा।
गुरुर विष्णू।
गुरुर देवो
महेश्वरा।
गुरू साक्षात परब्रह्म।
तस्मई श्री गुरू देव नमः

अशी आपण गुरूंची (Guru Purnima) ओळख करून देतो. गुरू म्हणजे काय ? गुरूंचे महत्व काय? आपल्या जीवनात गुरूंचे असणे म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींची उत्तरे एका लेखात मिळणे अशक्य आहे यास्तव थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याला देव दाखवता येत नाही, पण गुरूंच्या माध्यमातून आपण देवालाच अनुभवत असतो. देवाने गुरूंच्या माध्यमातून केलेली कृपा अनुभवत असतो. गुरूंची लीला शब्दात मांडणे अशक्य आहे. म्हणून तर आपण दरवर्षी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरा करतो.
 
गुरू हा संतकुळीचा राजा।
गुरू हा प्राण विसावा माझा।
गुरुविण देवपूजा पाहत नाही त्रैलोकी।
 
वरील काव्य पंक्तीतून गुरू (Guru Purnima) शब्दाची महती येते. कारण गुरूला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुच आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात. प्रथम आपण गुरु या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे नाहीसे करणारा. गुरू आपल्याला जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे शिकवतात आणि प्रकाशाच्या म्हणजेच ज्ञानरुपी योग्य वाटेवर चालण्यास प्रवृत्त करतात. गुरू म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा आहे. अंधकाराचा नाश करून प्रकाशाचा किरण देणारा गुरू असतो. एकदा का गुरू आपल्या आयुष्यात आले की त्यांची कृपा सतत आपल्यावर होत राहते. गुरूंनी सांगितलेली साधना सतत करणे हीच गुरूंविषयी (Guru Purnima) खरी कृतज्ञता होय. गुरू आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात. त्यांना आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहणे एव्हढेच अपेक्षित आहे. त्यासाठी ते आपल्या शिष्यांना उत्तम असे ज्ञान देत असतात. जर उत्तम ज्ञान मिळवून उत्तम व्यक्ती म्हणून समाजात ज्ञान कमवायचे असेल तर जीवनात गुरुंना पर्याय नाही.
 
माणसाच्या जीवनातील पहिले गुरू (Guru Purnima) म्हणजे त्याचे आईवडील. आई ही तर आपल्या जीवनातील प्रथम आद्य गुरू. आई इतकं श्रेष्ठ दैवत या जगात नाही असं समर्थांनी लिहिले आहे. मूल जेंव्हा लहान असते तेंव्हा आईवडीलच त्याच्यावर संस्कार करीत असतात.त्याला छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनात कसे वागायचे ते शिकवत असतात.आईवडील हेच तर आपले प्रथम गुरू असतात. म्हणून त्यांचा आदर करायला हवा.
 
आईवडीलानंतर नंबर लागतो तो शिक्षकांचा (Guru Purnima) त्यांचीही आपल्या जीवनात खूप महत्वपूर्ण भूमिका असते. मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार करण्याचे, बाल मनाला पैलू पाडण्याचे काम शिक्षक करीत असतात. मुलांच्या जीवनाला खरा आकार शिक्षकच देत असतात. आईवडील आणि शिक्षकांनी कोऱ्या पाटीवर केलेले संस्कार कायमस्वरूपी टिकून राहतात मग ते चांगले असोत की वाईट. त्याचाच प्रभाव त्या मुलांच्या पुढील आयुष्यात कायम राहतात. आईवडील आणि शिक्षकच नव्हे तर जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तींपासून काही ना काही तरी शिकतच असतो. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ- सूर्य, पृथ्वी, नदी, जल, वारा, अग्नी, झाडे, पाने, फुले, ढग, डोंगर निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी शिकवत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थांविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकाराची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. या सर्व गोष्टी जोपासण्यासाठी आपल्याला गुरूंची (Guru Purnima) आवश्यकता असते.
 
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.