शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर यांचे अमरावतीत जंगी स्वागत

20 Jul 2024 19:00:36
- विविध पक्ष व संघटनांनी केला सत्कार
 
Teacher MLA J M Abhyankar received warm welcome in Amravati

 
अमरावती :
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष व मुंबई शिक्षक मतदार संघाचे शिवसेनेचे नवनियुक्त आमदार ज.मो.अभ्यंकर यांचे अमरावतीत प्रथम आगमन होताच त्यांचे शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. याप्रसंगी आ.अभ्यंकर यांनी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून पक्ष बळकटी संदर्भात मार्गदर्शन केले.
 
मुंबई शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज.मो.अभ्यंकर यांचे अमरावतीत आगमन होताच शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे व संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत करीत आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. त्यानंतर सर्व ताफा इर्विन चौकात पोहोचला. आमदार ज.मो.अभ्यंकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारार्पण करित अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे युवा सेना, युवती सेना, महिला आघाडी, कामगार आघाडी तसेच विविध पक्ष व संघटनांतर्फे आ.अभ्यंकर यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी आ.अभ्यंकर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून पक्ष बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले.
 
हल्लाबोल आंदोलनास भेट
अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या हल्लाबोल आंदोलनाला मुंबई शिक्षक मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी भेट देत मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख सुनीलखराटे, सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 
विविध ठिकाणी केले वृक्षारोपण
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रेरणा पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत अमरावती येथील बिजवे वाडी, शिवपार्वती कॉलनी येथे मुंबई शिक्षक मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार ज.मो.अभ्यंकर, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0