वीज ग्राहकांना 27.78 कोटींचा परतावा

20 Jul 2024 21:32:52
 
Mahavitran
 
नागपूर :
वीज ग्राहकांच्या महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांना आर्थिक वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 27 कोटी 78 लाख 44 हजार 806 रुपये व्याज देण्यात येत असून त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील तब्बल 16 लाख 7 हजार 348 ग्राहकांना 23 कोटी 84 लाख 38 हजार 320 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 4 लाख 33 हजार 609 वीज ग्राहकांना 3 कोटी 94 लाख 6 हजार 486 रुपयांचे व्याज देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. व्याजाची ही रक्क्म ग्राहकांच्या वीजबिलात समयोजित करण्यात येत आहे.
सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतल्या जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीज ग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फ़े वापरल्या जाते, एवढेच नव्हे तर त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिल्या जाते. महावितरण ही ग्राहकांच्याच भरवश्यावर चालते, ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वीजवहन आणि वितरण, देखभाल आणि दुरुस्ती तसेच प्रशासनावरील खर्च भागविल्या जातो. अश्या वेळी ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे बील नियमित भरले तरच वीज खरेदी व वितरण करणे महावितरणला सहज शक्य होते.
वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करु शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिल्या जाते. वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फ़रकाच्या रकमेचे बील म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिल्या जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजमधून वळती करण्यात येत आहे.
वीज ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधिनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही नियामक आयोगाचे निर्देश आहेत. महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करतेवेळी ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केल्या जाते. यामुळे ग्राहकांनी अतिरीक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
Powered By Sangraha 9.0