छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

    20-Jul-2024
Total Views |
Chances of heavy rain in Chhattisgarh (Image Source : Internet/ Representative)
 
छत्तीसगड :
छत्तीसगडमध्ये मान्सूनने पुन्हा एकदा वेग पकडला असून बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर एक प्रणाली तयार झाल्यामुळे काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचेही विभागाने सांगितले आहे.
 
हवामान खात्याने राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत रायपूर, बालोद, दुर्ग, धमतरी, गरिआबंद, बस्तर, कोंडागाव, दंतेवाडा आणि सुकमा येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. नारायणपूर, विजापूर, राजनांदगाव, कांकेर, मोहला-मानपूर आणि खैरागड या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दंतेवाडा जिल्ह्यात २४ तासांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे बाचेली ते दंतेवाडा दरम्यान भानसी कॅम्पजवळ दोन मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. छत्तीसगड हवामान तज्ज्ञांच्या मते, काही वर्षांपासून राज्यात पावसाचा ट्रेंड सारखाच आहे. १५ जुलैनंतर पडणारा पाऊसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनची नवीन प्रणाली सक्रिय होत असल्यामुळे परिणाम संपूर्ण राज्यात दिसून येणार आहे.