वर्षा सहलीचा आनंद लुटा पण...

    02-Jul-2024
Total Views |
 
 
enjoy the monsson trip but
 (Image Source : Internet/ Representative)
 
राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले असून परिसर हिरवाईने नटला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तलाव विहिरीही भरल्या आहेत. धबधबे कोसळत आहेत. शेतशिवाराने हिरवा शालू नेसल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगर दऱ्यातून फेसळणारे धबधबे अनेकांना आकर्षित करत आहेत. विशेषतः तरुणांना या निसर्ग सौंदर्याचे आकर्षण जास्त आहे. त्यातही शहरात राहणाऱ्या वर्गाला निसर्गाचे जास्त कौतुक असते. कारण त्यांना निसर्गाचा जास्त सहवास लाभत नसतो. अशी मंडळी निसर्गाची नवलाई अनुभवायला पावसाळ्यात आवर्जून घराबाहेर पडतात. वर्षा सहलीचे आयोजन करतात.
 
वर्षा सहलीचा आणि पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असताना काही पर्यटकांना उत्साहाचे भान राहत नाही. विशेषतः तरुण वर्ग अतिउत्साहाच्या भरात नको ते धाडस करतात आणि त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडते. अशीच एक मोठी दुर्घटना नुकतीच लोणावळ्यात घडली. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोणावळ्यात वर्षा सहलीसाठी आलेल्या अन्सारी कुटुंबातील नऊ सदस्य लोणावळा धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या बुशी धरणावर वर्षा विहारचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अन्सारी कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यात लहान मुले व महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत असतानाच ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीतील नदीत एका तरुणाने रील बनवण्यासाठी उडी मारली. त्यात तो तरुण वाहून गेला. अर्थात अशी दुर्घटना घडल्याची ही पहिली वेळ नाही. जून महिन्यातच खालापूरच्या साई बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.
 
 
 
मागील वर्षी तर अशा अनेक दुर्घटना घडल्या होत्या. मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडझरी सिंचन तलावात बुडून चार तरुण मरण पावले होते. त्यातला एक तरुण सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला त्याला वाचवण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या इतर तीन तरुणांना देखील जलसमाधी मिळाली. पावसाळ्यात अशाप्रकारच्या दुर्घटना सातत्याने घडतात. याआधीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत आणि यापुढेही घडणार आहेत कारण वर्षा सहलीसाठी आलेले पर्यटक शिस्तीचे पालन न करता नको ते धाडस करतात विशेषतः तरुण वर्ग सेल्फी काढताना, रिल बनवताना स्वतःचा जीव धोक्यात घालतात. वर्षा सहलीचा आणि पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असताना काही गोष्टींची खबरदारी घेण्याची गरज आहे. सध्या कुठेही गेल्यावर सेल्फी घेणे, व्हिडिओ बनवले, रील बनवणे, फेसबूक लाईव्ह करणे हा ट्रेंड झाला आहे. या ट्रेंडच्या नावाखाली अनेकदा उंच डोंगरावरुन, घाट माथ्यावरून, धबधब्याच्या टोकावरून, चारचाकी गाडीच्या टफावरून किंवा खिडकीतून तोंड बाहेर काढून, दुचाकी वरून स्टंट करुन व्हिडिओ बनवले जातात. सेल्फी काढले जातात, रिल बनवले जातात मात्र पावसाळ्याच्या दिवसात हे प्रकार जीवावर बेतू शकतात. लाईक, शेअर आणि कमेंटच्या नादात तरुणवर्ग हे धाडस करतात. मात्र हेच धाडस मोठ्या दुर्घटनेस निमंत्रण देणारे ठरते.
 
पावसाळ्यात रस्ते अधिक घसरट झालेले असतात. खड्डयांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डा किती मोठा आहे याचा नेमका अंदाज येत नाही. काहीतरी थ्रिलिंग करण्याच्या नादात शरीराला इजा करून घेणे योग्य नाही. नदी, तलाव, धरणे, धबधबे याठिकाणी सहलीला गेल्यावर तर अधिक दक्ष राहावे लागतात. कारण तिथे एखादी छोटी चूकही जीवघेणी ठरु शकते. नदी, तलाव, धरण, समुद्र या ठिकाणी पोहण्यास गेलेले तरुण बुडून मरण पावल्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. खरंतर याबाबतीत पर्यटकांनी स्वतःच काळजी घेतली पाहिजे. पण उत्साहाच्या भरात अनेकांना त्याचे भान राहत नाही म्हणून पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापनाने याबाबतीत काळजी घेतली पाहिजे. सावधानतेच्या सूचना ठळकपणे लिहिल्या पाहिजेत. पाण्याची पातळी किती असल्यास कोणत्या मर्यादेच्या पुढे जाणे धोक्याचे आहे, याबाबत संबंधितांना इशारा दिला पाहिजे.
 
धबधबे पाहण्यास गेलेल्या पर्यटकांना तर तशा सूचना देण्याची सक्त गरज असते. अशा ठिकाणी मुसळधार पावसात जाणे तर चुकीचेच असते. त्याचप्रमाणे गड, किल्ले, डोंगरमाथ्यावर भटकताना देखील भान ठेवणे तितकेच गरजेचे असते. अशा ठिकाणी जोराचा पाऊस आला तर कोणती खबरदारी घ्यावी तसेच अशावेळी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची कोणतीही तजवीज केलेली नसते. त्यात काही महाभाग अशा ठिकाणी मद्यपान करून पर्यटनाला जातात. तरुणांनी हे कटाक्षाने टाळले पाहिजे. पर्यटकांनी स्वतःची व स्वतः बरोबर आलेल्यांचीही काळजी घेतली पाहिजे. वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटा, मजा करा पण ही मजा जीवावर बेतणार नाही याचीही काळजी घ्या.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.