Rain Alert : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

19 Jul 2024 12:47:27
Warning of heavy rain
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 21 जुलै या पर्यंत मुसळधार पाऊस, वादळीवारा, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 19 व 20 जुलै रोजी ऑरेज अलर्ट दर्शविण्यात आला आहे.
 
या कालावधीत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे जिल्ह्यातील समस्त नागरिक व शेतकऱ्यांनी पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. याचबरोबर घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने आपल्या सूचनामध्ये स्पष्ट केले आहे.
 
नागरीकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्टु असलो तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत असतांना पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असतांना चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
 
अधिक माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर दु. क्र. ०७१२-२५६२६६८ येथे संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0